Ranjit Ghatge

Sep 17, 20202 min

पेशवेकालीन घराणी :- मूळ आडनावे व बदलेली आडनावे - एक दृष्टीक्षेप

पेशवे काळात बरीच कुटुंबे कोकणातून व अन्य ठिकाणाहून आली . गोखले, पटवर्धन , भट ,लिमये , अशा मूळच्या आडनावांमध्ये , कामानुसार, मिळालेल्या जहागिऱ्यानुसार, किताबांनुसार , पुढे आडनावात बदल झाले

त्यापैकी काही घराणी आपण पाहूयात.

१) सरदार तुळशीबागवाले :- मूळ आडनाव खिरे - तुळशीबागेचा परिसर इनाम मिळाल्यावर आडनाव तुळशीबागवाले झाले.

२) सरदार रास्ते :- मूळ आडनाव गोखले -विजापूरच्या बादशहा साठी एक मोठी बेवारशी मिळकत एका पैशाचीही गफलत न करता सरकार जमा केली . त्यावर बादशहा म्हणाला " कितना नेक और रास्त काम किया है इनको तो रास्ते बुलाना चाहिये " तेव्हा पासून. आडनावात रास्ते असा बदल झाला.

३) सरदार खासगीवाले :- मूळ आडनाव लिमये - पेशव्यांचा खासगीतला कारभार बघू लागल्या नंतर आडनावात खासगीवाले असा बदल झाला.

४) सावकार दीक्षित :- मूळ आडनाव पटवर्धन - ह्यांच्या घराण्याने विधिवत अग्निहोत्राची दीक्षा घेतल्यामुळे आडनाव दीक्षित असे झाले.

५) सरदार मुजुमदार :- मूळ आडनाव प्रभुणे - प्रमुख कार्यालयीन अधिकार पदामुळे मुजुमदार झाले - फारसी मध्ये मूळ शब्द "मजमू" असा आहे त्याचा अर्थ अमात्य असा आहे .पेशव्यांची सर्व फर्माने, खलिते, पत्रव्यवहार, ह्यांच्या सही शिक्क्यांशिवाय पाठवला जात नसे.

६) सरदार बिनीवाले :- मूळ आडनाव चिंचाळकर -सामान्य पदापासून आघाडीचे (बिनीचे) सरदार झाले म्हणून बिनीवाले आडनावाने ओळखले जात.

७) सरदार विंचूरकर :- मूळ आडनाव दाणी - विंचूर गाव ईनाम मिळाल्यावर विंचूरकर आडनाव झाले (हे घराणे अन्नधान्य , रसद , दाणा गोटा, यांचा सरकारी हिस्सा गोळा करून त्यातले एक मूठ दाणे त्यांना दिलेल्या अधिकारानुसार आपल्या कडे ठेवत असत , त्या वरून दाणी हे नाव रूढ झाले)

८) सरदार पारसनीस :- मूळ आडनाव एकबोटे - फारसी भाषेतला सर्व पत्रव्यवहार बघत म्हणून पारसनीस असा आडनावात बदल झाला.

९) सरदार फडतरे :- मूळ आडनाव भट - फडावरचा ( आर्थिक व हिशोब व्यवहार खाते) कारभार पाहत म्हणून फडतरे असा बदल झाला.

१०) सरदार नगरकर :- मूळ आडनाव अभ्यंकर - नगरची जहागिरी मिळाल्यावर नगरकर आडनावाने ओळखले जात . शनिवार वाड्याच्या बांधकामासाठी लागणारे सर्व लाकूड हे पुरवत म्हणून ह्यांना "लकडे "नावाने सुद्धा ओळखत असत.

११) नाना फडणवीस :- मूळचे आडनाव भानू - ह्यांच्या आजोबाना फडाचे प्रमुख म्हणून नेमले गेल्या पासून ह्यांचे घराणे फडणवीस नावाने ओळखले जाऊ लागले.

१२) पेशवे घराणे :- मूळ आडनाव भट - छत्रपती शाहूंनी यांना पेशवा म्हणून नेमल्यावर पेशवे हे आडनाव म्हणून रूढ झाले. पेशवा हा मूळ शब्द फारसी असून त्याचा अर्थ सर्वोच अधिकार असणारा (पंत प्रधान) असा होतो. पण पेशवे शिवाजी महाराजां पासूनचे पद आहे . त्यांचे पहिले पेशवे मोरोपंत पिंगळे होते . अशा तर्हेने पिंगळे सुद्धा पेशवेच होते.

१३) घाशीराम कोतवाल :- मुळचा घाशीराम सामळदास - पुण्याची कोतवाली मिळाल्यामुळे तो घाशीराम कोतवाल नावाने ओळखला जाऊ लागला. वरील सर्व नरोत्तमांमध्ये या नराधमाचे नाव येणे योग्य नाही , पण माहिती म्हणून दिले आहे.

१४) गोविंदपंत बुंदेले :- मूळ आडनाव खेर - बुंदेलखंड भागातले मोठे प्रसिद्ध सरदार म्हणून इतिहासात बुंदेले नावाने यांचा उल्लेख सापडतो .

अशाच तऱ्हेने मध्य आणि उत्तर पेशवाईतील काही घराण्यांची , (खास करून महाराष्ट्रा बाहेरील) त्यांच्या वतने , जहागिऱ्या , या नुसार मूळ आडनावे बदलली गेली , या मध्ये जिन्सीवाले , मंदसोरवाले, अशी काही आडनावे रूढ झाल्याचे दिसते.


 

आपण म्हणतो नावात काय आहे ? पण वरील घराण्यांच्या नावांमध्ये , अभिमान ,घराण्याचा गर्व , इतिहास ,कर्तबगारी , आणि असामान्यत्व , हे गुण पुरेपूर आणि ओतप्रोत भरलेले दिसतात.

आजही हि घराणी, ही उपनामे अभिमानाने वापरतात.

    7740
    5