top of page

पुण्यातली अमृततुल्य : चहाची हॉटेल्स


"चहाला वेळ नसते पण वेळेला चहा लागतोच!"


अतिशय समर्पक वाक्य, आपल्याला लागणाऱ्या तल्लफेतली सर्वात तीव्र. भारत हा जगातला सर्वात जास्त चहाचा वापर करणारा देश. इंग्रज नाजूक साजूक पणे चहा पिणारा, जपानी तर समारंभपूर्वक बेचव चहा पिणारा, आपण मात्र उकळत्या आधणात साखर, दूध, मसाला घालून, बशीने फुर्र फुर्र आवाज करत, प्रत्येक घोटाचा आस्वाद घेत चहा पिणारी माणसं.


भारतासारख्या विशाल देशात चहाचे सुद्धा विविध प्रकार, काश्मीरी लोकांचा काहवा, लिंबू टाकून प्यायचा काळा चहा, इराण्यांचा कडक चहा, वगैरे. या सगळ्यात स्वतःचे वेगळे अस्तित्व ठेवणारा आणि भरपूर लोकप्रिय चहा म्हणजे अमृततुल्य होटेलां मधला खास चवीचा चहा. थोडासा जास्त गोड, आणि विलायची,आलं, सुंठ, अशा नाना स्वादाचा आणि चवीचा उत्तम समन्वय असणारा आणि तरतरी देणारा हा चहा खरंच अमृततुल्य असे.

हा चहा देणारी उपहार गृहे हाच एक रंजक विषय आहे.शंकराची फारशी प्रचलित नसणारी नावे असणारी. ही हॉटेल्स , भूर्भुरेश्वर , जबरेश्वर , नर्मदेश्वर , अशा नावाची असत. त्यांची मांडणी, गल्ल्यामागचा माणूस, आणि त्यांचा चहा, सारेच वैशिष्ट्यपूर्ण असे.



या सर्वांची सुरवात राजस्थानातल्या नारते गावी झाली, या गावातील पन्नालाल ओझा व त्यांच्या पत्नी पुण्यात पायी प्रवास करून आले असे सांगतात . साल होते १८८०, पण त्यांचे पुण्यातले पहिले "आद्य अमृततुल्य" सुरु होण्यास १९२४ साल उजाडले. राजस्थान स्वीट होम हे दुकान प्रथम त्यांनी काढले .इतर व्यवसायही करून बघीतले , पण शेवटी चहाच्या व्यवसायात स्थिरावले. त्यांच्या आधाराने बरीच राजस्थानी कुटुंबे पुण्यात आली, हळहळू या अमृततुल्यांची संख्या वाढू लागली व त्यांच्या चाहत्यांची सुद्धा.


महत्वाची गोष्ट अशी कि या काळात इराण्यांची हॉटेल्स पूर्णपणे प्रस्थापित झालेली होती , त्यांच्या स्पर्धेत उतरून स्वतःचा चाहता वर्ग निर्माण करण्याची किमया यांनी करून दाखवली . बाहेर जाऊन दुकानातला चहा पिणे हे त्या काळात शिष्टसंमत नव्हते.



या दुकानांचे सर्व साधार स्वरूप सारखेच असे .आत गेल्यावर छोट्याश्या उंचीच्या चौथऱ्यावर चहा करण्याचे काम चाले . पितळी स्टोव्हव, आधणाचं पातेले उकळत असे. स्वच्छ पांढरे धोतर आणि हाफ सदरा घातलेला रामप्रसाद किंवा भवानीशंकर अशा तत्सम नावाचा इसम लांब दांड्याच्या ओगराळ्याने किंवा माठातून पाणी काढायच्या लांब दांडीच्या पात्राने चहा ढवळत बसलेला असे. मधूनच या लांब दांडीच्या पत्राने चहा घेऊन त्याची धार वरून सोडत असे. पडणाऱ्या धारेचा रंग, दाटपणा ह्याच्या कडे एक नजर टाकून तो चाहातल्या घटकांच्या कमी जास्त पणाचा अंदाज बांधून कमी जास्त प्रमाणात योग्य तो पदार्थ घालत असे. मधूनच पितळी खलबत्त्याने त्याचा चहाचा मसाला कुटत असे. मसाल्याची पुरचुंडी थोड्याश्या कळकट दिसणाऱ्या कापडात बांधलेली असे. हि पुरचुंडी चहाच्या आधणात बुडवून काढून, हातातल्या सांडशीने ती पुरचुंडी पिळून, त्याचा अर्क आधणात मिसळत असत. ह्या मसाल्यात घालावयाचे जिन्नस व त्यांचे प्रमाण हे गुलदस्त्यातले रहस्य होते. मधून मधून तळ हातावर थोडासा चहाचा नमुना घेऊन स्वतः चाखून स्वाद आल्याची खातरजमा करून झाल्यावर मगच तो चहा कीटलीत ओतला जाई.



त्याचे हे काम निर्विकार चेहेर्याने एखाद्या निष्काम कर्मयोग्याच्या स्थितप्रज्ञतेने चाले. कपाळावरच्या पांढऱ्या गन्धा मुळे त्याचा चेहेरा धीर गंभीर दिसत असे. दुधाचे पातेले वेगळे ठेवलेले असे. समोरच्या ग्लासमध्ये प्रथम दूध ओतून. त्यावर किटलीतून चहाची लांब धार सोडल्यामुळे चहावर फेस येई. गिर्हाईकाने मागवलेल्या टेबलवर हा ग्लास ठेवण्यात येई, त्या अगोदर खांद्यावरच्या काहीशा अस्वच्छ फडक्याने टेबले पुसून घेतले जाई. प्रत्येक नवीन बॅच मधला एक कप चहा रस्त्यावर फेकला जाई. कुठल्याश्या अदृश्य देवाला वाहिलेला हा चहा रुपी प्रसाद अर्पण करण्याची हि प्रथा असावी.


यांचा चहा पण बहुदा मंडईतल्या दत्त मंदिरा जवळच्या " महाराष्ट्र टी डेपो " मधून आणला जाई. सी.टी.सी, ऑरेन्ज पीको,फ्लॉवरी पीको, आणि सी.टी.सी. डस्ट अशा चहांच्या अनेक प्रकारच्या चहांच्या पावडरींच्या मिश्रणातून त्यांच्या विशिष्ट चहाचे मिश्रण तयार होई. बहुदा कोकणातून आलेल्या बाल्या लोकांना कामावर ठेवले जाई . पूर्वी फक्त चौकोनी बरणीत ठेवलेले क्रिम रोल, अथवा नान कटाई किंव्हा पिळाची खारी बिस्कीटे एवढाच सीमित मेनू असे. आत्तासारखे, पोहे, मिसळ, वडा, असले नाश्त्याचे पदार्थ नसत.


यांची गिर्हाईके म्हणजे, विद्यार्थी, रिक्षावाले, फेरीवाले, वेळी अवेळी गप्पासाठी जमणारी मंडळी, कपड्यावर भांडी देणाऱ्या बोहारणी (आता नामशेष झालेली जमात ). या बोहारणी पूर्वीच्या काळी रस्त्याच्या पलीकडे बसून, जवळच्या बेकरी मधून पाव वगरे आणून या चहाबरोबर दुपारचा नाश्ता करत असत. स्वतः चहा बिस्किटे खातानाच तान्ह्या पोराला दूध पाजत आणि पुढचा टप्पा चालू करण्या अगोदर विसावा घेत. रात्री उशीर पर्यंत जागुन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी मंडळींचा हा महत्वाचा आधारवड असे.



अलीकडे आलेली, येवले, सायबा, ही हॉटेल फारच वेगळी आहेत. चहाचे पाणी टायमर लावून उकळणे, डिस्पेन्सर मधली पूर्व मिश्रित चहा साखरेची प्रमाणबद्ध मिश्रणे, यामुळे मानवी कौशल्याचे यांत्रिकीकरण झाल्यासारखे झाले आहे. चहांचे बासुंदी चहा, तंदुरी चहा, असले चहांचे वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत. मोठं मोठाल्या कंपन्यांनी आता, मसाला चहाची पावडर विकायला सुरवात केली आहे. चहाची कॅफेज, पार्लर,चहाच्या हातगाड्या सुद्धा, या जुन्या अमृततुल्यांच्या मुळावर आल्याने हा जुना चविष्ट आणि उत्साहवर्धक व्यवसाय लयाला जाऊ लागला आहे.


एक मात्र खरे कि नव्या स्वरूपात का होईना चहाचा हा व्यवसाय तग धरून आहे. अशा या चहा महात्म्याला आणि अमृततुल्य चहापान गृहांना सर्व चहा बहाद्दरांतर्फे त्रिवार प्रणाम.

(आधार :-टाइम्स ऑफ इंडिया)


Disclaimer: Photographs are not taken by me and are only for representational purposes. Original copyrights lie with the owners.

154 views3 comments
bottom of page