top of page

पुण्यातील इटालीयन खाद्य संस्कृतीतला आद्य जनक - एनरिको म्युरॅतोर

ब्रिटिशानी पेशवाईचे अस्तित्व संपुष्टात आणल्यावर- कॅम्प एरियाचा विकास झाला, निरनिराळ्या बेकरीज होटेल्स, फॅशन्स ची दुकाने १८८० च्या सुमारास येऊ लागली.


साधारण १९०० च्या सुमारास मेन स्ट्रीट वर इनरिको म्युरॅतोर नावाच्या इटालीयन माणसाने एक बेकरी सुरु केली .

१९०६ च्या सुमारास ती बेकरी ईस्ट स्ट्रीट वर स्थलांतरीत झाली.

या बिल्डिंग चे मालक होते सर माणेकजी मेहता , त्यानी ही जागा एनरिकोला करार पट्ट्याने दिली होती.


नवीन प्रशस्त जागेमध्ये बेकरी आणि आणि रेस्टॉरंटचे नामकरण झाले. “ हॉटेल इ. म्यूरातोर “.




ऑम्लेटस, रीसोत्तो ,पास्ता , वगैरे इटालीयन आणि काही फ्रेंच पदार्थ व बेकरी आयटेम्स, यांनी सुरवात झाली .

त्या बरोबरच कॅटलन आणि फ्रेंच वाईन्स ( मोएत ए शांदोन )सुद्धा मिळू लागल्या.

दारू वरचा नफा बराच होता.


मोठ्या दगडी बिल्डिंग मध्ये ,शोभेच्या कुंड्या, शोभेच्या वनस्पती , फेटा बांधलेले यूनीफॉर्म घातलेले वेटर्स , पांढऱ्या स्वच्छ कव्हर्स ने आच्छादलेली टेबल्स. आणि स्वागतास उभा असलेला स्वतः इनरीको आणि एक वेटर शंकर. आशा थाटाने सुरु झालेले हे हॉटेल, अल्पावधीत ब्रिटिश लोकांमध्ये प्रसिद्ध झाले.

हॉटेल ला डान्स फ्लोअर सुद्धा होता.


बदल्या होऊन निघालेल्या ब्रिटिश सैनिक अधिकारी व शिपायांचे निरोप समारंभ , पार्टीज, या निमित्तांने होटल मध्ये वर्दळ वाढू लागली.स्वादिष्ट आणि ताजे पदार्थ आणि बेक्ड गुड्स यांची पसंती वाढीस लागली.

पेस्ट्रीज, क्रोझो, गार्लिक ब्रेड ,कूकीज, पास्ता या पदार्थांना खूप मोठी पसंती आणि मागणी असे.



मुंबईहून पळून पुण्यात आलेल्या ६ जर्मन आणि एनरिको यांना ६ जॅन्युअरी १९४० ला पकडण्यात आले. त्यांना एलिअन्स म्हणत असत. एनरिको ला पुरंदर किल्ल्यांत स्थानबद्ध करण्यात आले. आणि तेथूनच त्याचा ठाव ठिकाणा काळाच्या पडद्या आड गेला.


इकडे त्याच्या हॉटेलचा लिलाव झाला.त्याची जागा गुलाम हुसेन पाकसीमा नावाच्या माणसाने घेतली.

हा गुलाम हुसेन एक हॉटेल धंद्यातला जाणकार आणि यशस्वी हॉटेल मालक होता.

त्याची मुंबईत काही हॉटेल्स सुद्धा होती. समाजात त्याची उच्चभ्रू लोकात ऊठबस होती.

योगाचार्य श्री अय्यंगार यांना पुण्यांत आणावयात त्याचा मोठा हातभार होता.

त्याने १९४७ पर्यंत हे हॉटल वजा बेकरी उत्तम पणे चालविली. त्या नंतर तो फाळणी नंतर १९४७ ला पाकिस्तानात निघून गेला.


त्याच सुमारास श्री गजानन राव साठे, (जे साठे बिस्किट व चॉकलेट चे मालक होते) यांची पाकिस्तानात कराची येथे

साठे सिन्ध चॉकोलेट फॅक्टरी होती. त्या काळात साखरेचे रेशनिंग चालू होते व पुण्यात साखरेचा कोटा कमी होता. पण सिंध प्रांतात तो भरघोस होता. म्हणूनच त्यांनीं सिंध प्रांतात हा कारखाना चालू केला होता.


त्या वेळेस ड्रिंकिंग चॉकलेट बनवणारी ही आशियातली एक मोठी फॅक्टरी होती.

गुलाम हुसेन पाकसीमा ने ही फॅक्टरी विकत घेतली, ( अजूनही सिंध चॉकलेट फॅक्टरी नावाने चालू असल्याचे सांगितले जाते) आणि साठ्यांना बदल्यात पुण्याची “ इ. म्युरॅतोर ” ची जागा देउन टाकली.


पुढे ही बेकरी व हॉटेल गणपतराव साठे, एल.डी.भावे ( गॅस एजन्सी वाले ) ,आणि शंकर राव जोशी यांनी चालविले.

पण १९५३ साली मोरारजी भाई देसाई यांनी दारुबंदी कायदा आणला, आणि हॉटेलचा नफा घसरू लागला.

कारण बराचसा नफा वाइन्स आणि इतर अल्कोहोलिक मद्यांवरूनच मिळत होता.


१९५४ साली शेवटी साठे,भावे जोशी प्रभृतींनी “ इ. म्युरॅतोर” विकून टाकले.

क्वालिटी रेस्टॉरंट, टेलीफोन ऑफिस आणि कयानी बेकरी हे तीन नवीन मालक झाले.



श्री.विश्राम बेडेकर ,व्ही.शांताराम ,इत्यादी मान्यवर येथे जेवावयास येत असत.

त्या काळी असल्या पाश्चात्य हॉटेलात जेवणे निषिद्ध मानली जात होती त्या मुळे लोक चोरून खाण्यास येत असत.


म्यूरॉटॉर च्या पेस्ट्री ला “म्युरातोर ची बर्फी “असे सांबोधले जात असे.

गणपतीच्या मेळाव्या मध्ये त्याचा उल्लेख असणारी प्रहसने, आणि पदे म्हणल्याचा उल्लेख सुद्धा आहे.


एक १९०६ सालापासूनची सुमारे चाळीस वर्षे इटालीयन, युरोपियन आणि फ्रेंच खाद्य संस्कृती जोपासणारी “इ. म्युरातोर“ नावाची खाद्य संस्था काळच्या पडद्या आड गेली.

आजच्या कयानी बेकरीची बेकिंग ओव्हन्स , इत्यादी इक्विपमेंटस् मूळची म्युरॅतोर चीच होती.


आजच्या मल्टी क्युझीन च्या पाट्या आणि बिरुदे मिरविणाऱ्या हॉटेलचा मूळ जनक एनरिको म्युरातोर तर कालाच्या पडद्या आड विरूनच गेला.





साभार संदर्भ- १)चिन्मय दामले - हिंदुस्थान टाईम्स


२) पारसी पंचायत खबर


३) व्हॅट्स हॉट




रणजीत घाटगे.


१ मार्च २०२४


535 views4 comments
bottom of page