रामकृष्ण गणेश भांडारकर यांचे पुण्यासाठीचे योगदान अनन्यसाधारण आहे. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था ही भांडारकरांच्या स्मरणार्थ बांधली गेली. ६ जून १९१७ साली स्थापित झालेल्या या संस्थेने शतकी वाटचाल पूर्ण केली आहे . प्रकांड पंडित, थोर समाज सुधारक, भारतीय पुरातत्त्वाचे थोर विद्वान, धार्मिक रूढींमध्ये मोठ्या सुधारणेचे आग्रही, अशी किती तरी विशेषणे त्यांना लागू पडतात.
भारतात ब्राम्हो समाजाची संकल्पना राजा राम मोहन रॉय यांनी १८३० साली बंगालमध्ये साकारली. १८६१ साली पंडित नवीन चंद्र रॉय यांनी पहिल्या ब्राम्हो समाजाची स्थापना लाहोरमध्ये केली. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना १८६७ आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांच्या अध्यक्षतेखाली साली झाली.
याचाच एक भाग म्हणून पुण्याची शाखा १८७० साली न्यायमूर्ती रानडे आणी रामकृष्ण भांडारकर यांच्या पुढाकाराने झाली.
बहुईश्वरवाद, मूर्तिपूजेचा विरोध, बालविवाह, आणि सती, जात पात या सारख्या अनिष्ट पण रूढ प्रथांचा बिमोड करण्याची ब्राम्हो समाजाची मूळ उद्दिष्टे होती. या विचारधारेचा प्रसार करण्यासाठी स्वतःच्या एका जागेची आवश्यकता होती. १९०९ साली बुधवार पेठातल्या पासोड्या विठोबा मंदिराच्या पिछाडीस असलेल्या जागेत हि वास्तू उभी राहिली. प्रथमतः ते एक छोटे मंदिर होते. पुढे १९२० साली सर नारायण गणेश चंदावरकर यांनी भांडारकरांच्या वाढदिवशी मोठ्या वास्तूची पायाभरणी केली, आणि मोठी वास्तू उभी राहिली.
मूर्ती विरहित, असलेली हि वास्तू पूर्ण दगडाची आहे. पौर्वात्य आणि पाश्चिमात्य घटकांचा वापर करून हि देखणी वास्तू साकार केली आहे. तीन मोठ्या कमानींच्या व्हरांडयातून आत मधल्या मोठ्या सभागृहात प्रवेश करता येतो. सभागृहाचा आकार बघून प्रार्थना समाज त्या काली किती लोकप्रिय आणि विस्तृत होता याची कल्पना येते. या सभागृहात या समाजाच्या विचाधारा आणि प्रबोधन कारक, प्रसार करणारी व्याख्याने, सभा, विचारमंथने, बैठका इत्यादी होत असत.
ही वास्तू पुरातत्वखात्याच्या प्रथम श्रेणी मध्ये येणाऱ्या अनेक वास्तूंपैकी एक आहे. या वास्तूचे मुख्य महत्व म्हणजे येथे भांडारकरांची समाधी आहे. त्यांच्या रक्षा कलशावर एक छोटा स्तूप बांधला आहे. त्याच्या वरच्या स्मृती पटावर भांडारकरांच्या कार्याचा आणि त्यांच्या समर्पण भावनेचा गौरव पूर्वक उल्लेख केला आहे. या वास्तूचे नाव आहे "हरी मंदिर."
बुधवार पेठेत भर वस्तीत असणाऱ्या या पुनीत वास्तूला एकदा तरी भेट देऊन भांडारकरांच्या समाधी पुढे नतमस्तक होणे हे प्रत्येक पुणेकराचे आद्य कर्तव्य आहे . आजही काही पुरोगामी लोकांनी बडेजाव आणि लंब्या चवड्या विवाह विधींना छेद देऊन ब्राम्हो समाजाच्या पद्धतीनुसार विवाह केल्याची उदाहरणे तुरळक का होईना पण सापडतात.
तळ टिप :- मध्यंतरी हि वास्तू पुरातत्व खात्याच्या यादी मधून काढून तेथे दुसरे काही तरी बांधण्याचा काही मंडळींनी प्रयत्न केला . पण बाळासाहेब खोले नावाच्या एका जागरूक गृहस्थांमुळे हा प्रयत्न फसला होता .
Disclaimer: These have not been taken by me. The copyrights belong to the original photographer.
コメント