मागच्या लेख मी काही पेशवेकालीन सरदार घराण्यांच्या मूळ आणि बदललेल्या आडनावांचा उल्लेख केला होता. आज शिवकालीन आणि नंतरच्या काळातल्या सरदार आणि प्रसिद्ध व्यक्तींच्या मूळ आणि बदलेल्या आडनावांचा इतिहास पाहू. येथे सुद्धा मूळ गावांची नावे, खिताबती, दत्तक विधान, उपाध्या, पदव्या, इत्यादी कारणांमुळे नावे आणि आडनावांमध्ये बदल झाले.
१) शाहू महाराज :- कागलच्या घाटगे घराण्यात यशवंतराव घाटगे नावाने जन्मले . कोल्हापूरच्या भोसले घराण्यात दत्तक गेल्यावर शाहूजी भोसले नावं झाले.
२) सरदार होळकर घराणे :- मूळचे आडनाव चौगुले (चौगुला) - नीरा नदीच्या काठी जेजुरी जवळ असलेल्या होळ गावात नावारूपाला आले. म्हणून होळकर आडनाव झाले. पण हे कुटुंब पुण्याजवळील खेड शेजारच्या वाफगाव चे होते. आजही वाफगावला त्यांचा गढी वजा वाडा आहे.
३) सरदार चंद्रराव मोरे :- मूळ कृष्णाजी मोरे - विजापूर बादशाहाने चंद्रराव 'किताब दिल्यावर चंद्रराव मोरे म्हणवून घेत .
४) सरदार आंग्रे :- मूळ आडनाव संकपाळ ,पुण्याजवळच्या अंगरवाडी गावाचे पाटील म्हणून आडनाव आंग्रे लावीत .
५) सरदार मानाजीराव फाकड़े :- मूळ नाव मानाजीराव शिंदे - पूर्वी असामान्य धाडसी वीराला
"फाकडा" असे संबोधले जायचे म्हणून फाकडे आडनाव लावत - एरवी महादजींच्या नात्यातले हे ग्वाल्हेरकर सरदार -मानाजी शिंदे या नावानेच ओळखले जात .कोन्हेरराव एकबोटे , कॅप्टन जेम्स स्ट्यूअर्ट (इंग्रज ) आणि मानाजीराव शिंदे हे तिघेच फाकडा संबोधनाचे मानकरी होऊन गेले.
६) सरदार प्रतापराव गुजर :- बहलोलखान सुटका प्रकरणात शिवाजी राजांच्या शब्दाने व्यथित झालेल्या गुजरांनी , परत त्याच्यावर हल्ला करून प्राणाची आहुती दिली. मूळच्या कुडतोजी गुजरांना , "प्रतापराव " हा सन्मानाचा 'किताब शिवाजी राजांनी बहाल केल्यावर त्यांना प्रतापराव गुजर नावाने ओळखले जायचे .
७) अक्कलकोटचे सरदार भोसले घराणे :- औरंगाबाद जवळच्या पारध गावच्या शहाजी लोखंडे यांनी छत्रपती शाहुंवर हल्ला केला त्यात ते मारले गेले . लोखंड्यांच्या विधवेने एकमेव लहान पुत्राला शाहूंच्या पायांवर घालून , त्याच्यावर कृपा करण्याची विनंती केली.
शाहूने त्या लहानग्याला आपले भोसले आडनाव दिले . आणि मोहीम फत्ते झाल्यामुळे त्याला फत्तेसिंग हे नाव दिले . हेच सरदार फत्तेसिंग भोसले , पुढे अक्कलकोट संस्थांनाचे मानकरी झाले , आणि त्यांचे घराणे भोसले हेच आडनाव लावू लागले .
८) सरदार आनंदराव धुळप ( कान्होजी आंग्र्यांच्या आरमाराचे , त्यांच्या नंतर प्रमुख )
जावळीच्या मोरे घराण्याचे वंशज - आदिलशाहीत एका मोहिमेत शत्रूची धूळधाण उडवली म्हणून त्यांना धुळप हा 'किताब' दिला म्हणून आनंदराव मोरे यांचे आनंदराव धुळप झाले .
९) संत तुकाराम :- पूर्वज जावळीचे मोरे घराणे - देशावर ह्यांचे पणजोबा स्थलांतरित होऊन देहूच्या आंबिले घराण्याच्या छत्रछायेखाली राहिले . त्यामुळे तुकाराम अंबिले असेच नाव लावत .
( ह्याची ऐतिहासिक पुष्टी नीटशी होत नाही , पण देहूच्या एका सन्मानीय ज्येष्ठ वारकरी समाजाच्या भक्ताने हि माहिती सांगितली )
१०) शहाजी आणि सरफोजी भोसले :- शहाजीच्या भोसल्यांच्या वडीलानी नगर जिल्ह्यातल्या शहा शरीफच्या दर्ग्याला बोललेल्या नवसामुळे पुढे झालेल्या एका पुत्राचे नाव शहाजी आणि दुसऱ्याचे नाव शरीफजी ठेवले . पुढे शरीफजीचा अपभ्रंश होऊन नाव सरफोजी झाले . हेच सरफोजी पुढे तंजावर भोसले घराण्याचे प्रमुख सरफोजी राजे भोसले म्हणून प्रसिद्ध झाले .
असा आहे काही मोजक्या घराण्याच्या नाम बदलाचा इतिहास !
असेच काही बदल- सर्जेराव शिंदे , झुंझारराव घाटगे , इत्यादी-सरदार घराण्यात आढळून येतात .
Comentarios