top of page

वडगावचा फक्कड बाबा

वडगावचा फक्कड बाबा, हे नाव वाचून हा कुठलासा ,पीर, दर्गा, स्थानिक देव, किंवा तांत्रिक बाबा असेल असे वाटते. पण वास्तव वाचून आश्चर्य वाटेल .


पहिले, इंग्रज - मराठा युद्ध सवाई माधव राव काळात लोणावळा, वडगाव, मळवली, कार्ला या पट्ट्यात झाले (डिसेंबर १७७८ ते सुमारे जानेवारी १७७९). राघोबा दादा, पेशवे पदाच्या मानसुब्याचा फज्जा उडाल्यावर इंग्रजांकडे गेले. पुण्यावर स्वारी करण्याचा बेत त्याने इंग्रजांच्या गळी उतरवला. पेशव्यांचे काही सरदार आपल्याकडे वळवण्याचे प्रलोभन हि दाखविले .


अखेर वॉरेन हेस्टिंग्सने कलकत्याहून फौज मागवली, त्या मध्ये काही युद्ध धुरीण अधिकारी होते. त्या मध्ये तरुण रक्ताचा कॅप्टन जेम्स स्ट्यूअर्ट नावाचा तगडा अधिकारी होता, अतिशय निडर आणि पराक्रमी म्हणून त्याचा लौकिक होता. शिवाय कर्नल हार्टली, कर्नल के, कर्नल इगर्टन हे वरिष्ठ अधिकारी होते.


मराठ्यांना या मोहिमेची कुण कुण लागताच नाना फडणवीसांनी होळकर आणि आणि महादजी शिंद्यांना त्यांच्या सैन्यासह बोलावले. इंग्रज सैन्य त्यांच्या अवजड तोफांसह बोर घाटाच्या पायथ्याशी पोहोचले. तोफा घाटातून नेण्यास येणारी अडचण पाहून त्यांनी स्ट्यूअर्ट ला घाट माथ्याला पुढे जाऊन तळ टाकण्यास सांगितले

त्यानुसार स्टुअर्ट व काही वरिष्ठ अधिकारी सैन्यासह वर पोचले. राघोबाच्या अटकळी प्रमाणे बजाबा पुरंदरे, मोरोबा फडणीस वगैरे इंग्रजांना सामील होण्याच्या तयारीत असतानाच नाना फडणीसांनी त्यांचा बंदोबस्त केला. चुलत भाऊ मोरोबा फडणवीसाला कैदेत टाकले.


जोरदार युद्ध सुरु झाले. हरिपंत फडक्यांच्या अधिपत्याखाली मराठ्यांनी पुढे सरकण्यास सुरवात केली तो पर्यंत ईस्ट इंडिया कंपनीचे सैन्य थोड्या तोफांसह वडगाव व कार्ल्या पर्यंत आले.

सरदार भिवराव पानस्यांच्या धडाडत्या तोफखान्याला ना जुमानता स्टूअर्टने मराठ्यांना एक महिन्यापेक्षा जास्त वेळ अडवून धरले. तो अचाट पराक्रम दाखवत तो मागची इंग्रज रसद येई पर्यंत लढत राहिला, या युद्धात कर्नल' के' चे गोळी लागून निधन झाले.


शेवटी ४ जानेवारी १७७९ या दिवशी एका उंच झाडावर चढून तो टेहेळणी करत असताना , त्याच्या धिप्पाड देहावरून त्याला हरिपंतानी ओळखले क्षणाचाही विलंब ना लावता त्यांनी लक्ष्य साधून तोफेला बत्ती दिली. स्ट्यूअर्ट जायबंदी होऊन खाली कोसळला. व त्याचे निधन झाले. पुढच्या लढाईत पेशव्यांनी इंग्रजांचा दारुण पराभव करून इंग्रजांना वडगावचा मानहानीकारक तह करण्यास भाग पाडले.


पण स्ट्युअर्टच्या अचाट पराक्रमाला सन्मान देऊन मराठ्यांनी त्याला " फाकडा " असे बिरुद दिले.

सर्वोच्च पराक्रमी. वीरासाठी " फ़ाकडे" हे संबोधन / बिरुद त्या काळी वापरले जात असे.

पेशवाईच्या काळात फक्त तीन लोकांना त्यांच्या अचाट धैर्यासाठी " फाकडा " असे गौरवार्थ बिरुद दिले होते.

पुरंदरचे कणेरीपंत एकबोटे , ग्वाल्हेरचे मानाजी शिंदे सरदार, आणि कॅप्टन स्ट्यूअर्ट हेच ते तीन मानकरी होत.

शत्रूला मानाचे संबोधन देणाऱ्या मराठ्यांच्या मनाचा मोठेपणा आणि पराक्रमची कदर यातून प्रतीत होते.


पुढे इंग्रजांनी मळवली जवळ त्याच्या आदरार्थी एक छोटा स्तंभ व एक छोटेसे चबुतरेवजा स्मारक बांधले. स्थानिक लोक त्याला " इष्टुर फाकडा " असेच म्हणत ( स्टुअर्टचा अपभ्रंश इष्टुर ). त्याच्या त्या स्मारकाला फक्कड बाबाचे स्थान असा दुसरा अपभ्रंश ( फाकडाचा अपभ्रंश फक्कड) होऊन फक्कड बाबा हे नाव स्थानिक लोकात रूढ झाले.आज हे स्मारक मावळ तहसील च्या कचेरीच्या आवारात आहे. काही स्थानिक लोकांनी कधी तरी तिथे दिवा बत्ती लावायला सुरवात केली. पुढे पुढे इथे उरूस भरू लागला. बोकडही कापला जाऊ लागला. तिथे होणाऱ्या कचेरीत याचा उपद्रव सुरु होताच, हा उरूस वजा उत्सव बंद करण्यात आला. आपल्या लोकांना कुठल्याही दगडाचे,

चबुतऱ्याचे, दैवीकरण करण्याचे एक खास कसब लाभले आहे. त्याचाच हा परिपाक .


अशी आहे फक्कड बाबाची चित्तरकथा. धडाडीच्या जेम्स स्ट्यूअर्टच्या पराक्रमाला मानाचा मुजरा !!

(आधार :- उदय कुलकर्णी / जेम्स किंकेड )


तळ टीप :- २०१९ मध्ये या स्ट्यूअर्ट च्या कथेला आणि उदात्तीकरणाला , काही स्थानिक लोकांनी विरोध केला , महादजी शिंद्यांच्या पराक्रमी विजयाचा गौरव होण्या ऐवजी स्टुअर्टचा उदो उदो करण्याला काही लोकांचा विरोध आहे .मूळ स्मारकाला हात न लावता , तिथे महादजींचा पुतळा बसवावा अशी मागणी होत आहे.


Disclaimer: Photos are not taken by me. Copyrights to the photos belong to the original photographers.

131 views0 comments

Comments


bottom of page